माणसामाणसातील वाद ऐकले असतील पण
कधी लाट आणि किनाऱ्यातील वाद
ऐकला आहे का?
जर वाद होत असतील ना,
तर जिंकत नेहमी किनारा असावा.
कारण आजन्म ती लाट त्या किनाऱ्याच्या,
एका स्पर्शासाठी थांबलेली असते.
मात्र किनारा तो किनाराच,
तो त्याचे गुणधर्म कसे सोडणार?
शेवटी लाटेने कितीही त्याला स्पर्श केला,
तरी तो तिला सागरातच सोडून येणार.
अस म्हणतात ना
काही गोष्टींसाठी आपण इतके झटत असतो,
आणि शेवटी ती नाही मिळाली ना,
तर त्या गोष्टीचं आकर्षण ही तिथेच लोप पावत.
शेवटी लाटेला ही तिच्या भावना होत्या,
तिचा स्वाभिमान होता.
ती स्पर्श करत गेली किनाऱ्याला पण,
तिने त्याच्याकडे कधी फिरून नाही पाहिलं.
हो हे खरंय,
जिंकला तिथे किनारा होता.
पण मन मोठ लाटेच होत.
किनारा याच भ्रमात होता की,
या वादात तो लाटेपासून जिंकला आहे.
आणि त्याने कितीही दुर्लक्ष केलं तरी,
लाट त्याला कधी सोडून नाही जाणार.
खर तर जिंकली इथे लाट होती.
कारण आता त्याच्या येण्याने आणि जाण्याने
तिला काहीच फरक पडत नव्हता.
ती किनाऱ्याच्या सोबत होती,
पण मुक्तपणे संचार करत होती.
त्याच्याकडून असलेल्या इच्छा, अपेक्षा आणि हट्ट,
ती कधीच सागरात वाहून आली होती.
आणि हा वेडा अजूनही विचार करतोय,
सागराच पाणी खार का आहे?