Saturday, December 9, 2023

मी गुंग फक्त माझ्यात असावे...

मी शोधते रोज विसावा,
आयुष्यातून जरासा.
कुठून तो मिळावा,
याचा नाही भरवसा.

किती किती पळते मी,
रोज सुटका करण्यासाठी.
तरीही रोज अटकते मी,
असते तीच गर्दी पाठी.

वाटतयं कुठे दूर जावं,
निवांत एक ठिकाण मिळावं.
माझ्यात थोड मी रमावं,
आयुष्याला हास्य मिळावं.

स्वप्नांत कधी उंच उडावं,
पाण्यात कधी मुक्त पोहावं.
वाऱ्यावरती मी डोलावं,
अन् स्वच्छंदी आयुष्य जगावं.

वाटतं मनमोकळ रडावं,
नाहीतर झऱ्यासारख संथ वहावं.
आज पाखरापरी भिरभिरावं,
अन् डोळ्यात सारं साठवावं.

इच्छांना साऱ्या पूर्ण करावं,
फक्त माझचं अस्तित्व जपावं.
त्या जगातच स्वतः ला हरवावं,
अन् पुन्हा परतून नाही यावं.

वेळेला ही आज थांबवावं,
अशक्य अस काही नसावं.
बोलते मी सगळ तेच व्हावं,
अन् तिथेच मला मी भेटावं.

वयाचे माझ्या भान नसावं,
आभाळात उंच विहरावं.
वाटेल तसं मुक्त खेळावं,
पुन्हा थोडसं बागडावं.

आसपास माझ्या कुणीच नसावं,
फक्त मी अन् माझं मन असावं.
कोणी कितीही धुंडावे,
तरी मी कूठे हे नाही कळावे.

खरंच एकदा तरी असे व्हावे,
मी अन् माझी सावली असावे.
गोंधळात सारे जग असावे,
अन् मी गुंग फक्त माझ्यात असावे.
मी गुंग फक्त माझ्यात असावे.

(ही माझी कविता माझ्या एकांतात विसावणारी , माझ्या मनाला शोधणारी आणि मला जाणणारी ,जे आयुष्य 

No comments:

Post a Comment

सागराच पाणी खार का आहे?

माणसामाणसातील वाद ऐकले असतील पण कधी लाट आणि किनाऱ्यातील वाद  ऐकला आहे का? जर वाद होत असतील ना, तर जिंकत नेहमी किनारा असावा. कारण आजन्म ती ला...